Ad will apear here
Next
धनू, मकर, कुंभ राशीला साडेसाती; काही उपाय, उपासना (पूर्वार्ध)


शुक्रवार, दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी सकाळी नऊ वाजून ५३ मिनिटांनी शनिमहाराज मकरेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे त्या वेळेपासून वृश्चिकेची साडेसाती संपून कुंभेची साडेसाती सुरू होते आहे. अशा रीतीने आता धनू, मकर आणि कुंभ या तीन राशींना साडेसाती सुरू असणार आहे. त्या निमित्ताने, पालघरचे ज्योतिष मार्गदर्शक सचिन मधुकर परांजपे यांनी दिलेली माहिती आणि सुचवलेल्या उपासना...
..........
शुक्रवार, दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी सकाळी नऊ वाजून ५३ मिनिटांनी शनिमहाराज मकरेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे त्या वेळेपासून वृश्चिकेची साडेसाती संपून कुंभेची साडेसाती सुरू होते आहे. अशा रीतीने आता धनू, मकर आणि कुंभ या तीन राशींना साडेसाती सुरू असणार आहे. चौथा शनी होत असल्याने कन्येची संपून तुळेला व वृषभेची संपून मिथुनेला ‘अडीचकी’ उर्फ पनवती सुरू होणार आहे. अर्थात वृश्चिक/वृषभ आणि कन्येच्या व्यक्तींना आता सुटकेचा नि:श्वास टाकायला हरकत नाही, तर कुंभ, तूळ आणि मिथुनेच्या मंडळींनी आता साडेसातीच्या व अडीचकीच्या जबाबदारीच्या कालखंडाला आता सुरुवात होते आहे असं मानून अधिकाधिक परिपक्वतेने, जागरूकतेने वागण्याची गरज आहे. जवळपास एक महिना अगोदरच लेखप्रपंच करतो आहे.

शनी एका राशीत साधारण अडीच वर्षे राहतो. तुमची रास व त्याच्या आधीची व नंतरची रास असा एकूण अडीच गुणिले तीन असा साडेसात वर्षांचा कालखंड म्हणजे साडेसाती असते. साडेसाती म्हटलं, की सामान्य माणूस मनातून कुठे तरी हादरून जातो... साडेसाती म्हणजे आता आपली काही धडगत नाही, काही तरी भयंकर घडेल, अनेक समस्या येतील की काय, अशा विचारांनी बरेच जणांची झोप उडलेली मी बघितली आहे.वास्तविक पाहता शनी हा इतर नवग्रहांपैकी एक ग्रह आहे. तो वृत्तीने थंड, शांत, मंदगती ग्रह आहे. मग तरीही आपल्याला त्याची इतकी भिती का वाटते, तर त्याचा स्वभाव हा सोशीक, सहनशील, संयमी, कृतिशील व न्यायप्रिय आहे म्हणून.... आधुनिक काळात हे वर उल्लेखलेले गुण आपल्यात जवळपास नामशेष झालेत. शनी जेव्हा साडेसातीच्या रूपाने तुमच्या राशीला येतो, तेव्हा तो या गुणांचे संक्रमण तुमच्या स्वभावात करण्याचा प्रयत्न करतो... हे गुण आपल्यात मुळातच कमी असल्याने मग आपल्याला त्रास व्हायला लागतो. शनी हा एक न्यायप्रिय ग्रह आहे. तो शांतपणे, धोरणीपणे निर्णय घेतो आणि आपण Result oriented life जगत असतो. त्यामुळे बरेचदा घटना घडतच नाहीत, लवकर काम होत नाही, उशीर होतो असे अनुभव येतात व त्याला आपण त्रास या व्याख्येत टाकतो. शनीच्या साडेसातीमध्ये तुम्ही कोणत्याही राशीचे असाल तरी तुम्हाला अत्यंत शांतपणे निर्णय घ्यावे लागतात... निर्णय घेताना घाई, उतावीळपणा झाला की त्याचे नुकसान तुम्हाला झालेच म्हणून समजा. हे पहिले बंधन पाळावेच लागते. त्यानंतर तुम्ही दैनंदिन व्यवहारात अत्यंत न्यायाने वागत असाल, इतरांची लुबाडणूक करत नसाल, संयमी असाल तर तुम्हाला साडेसातीचा त्रास होतच नाही असा माझा अनुभव आहे.

मकर राशीची मंडळी या साडेसातीत अतिशय त्रस्त झालेली आहेतच यात वाद नाही. धनूच्या मंडळींनी आगामी काळात धनाच्या बाबतीत अधिकाधिक सुरक्षित गुंतवणुकीचं धोरण ठेवायला हवं, सुरक्षित व्यवहार, जागरूकतेने वागणे गरजेचे आहे. धनव्ययावर (खर्च) जरा कंट्रोल ठेवायला हवाच. मकरेच्या मंडळींनी आता प्रत्येक बाबतीत शांतपणे, संयमाने वागण्याची गरज आहे. मन:शांती नष्ट करणारे प्रसंग घडू शकतात. त्यावर संयमित प्रतिक्रिया देणे योग्य असेल, वादविवाद टाळावेत....(हाच नियम मिथुन व तुळेच्या व्यक्तींना आहे)

कुंभ राशीच्या नवसाडेसातीजनांनी त्यांच्या नैसर्गिक विचारी/बुद्धिमान आणि सरळमार्गी स्वभावाला बदलण्याचा विचारही मनात आणू नये. कुंभेला शनिमहाराज साडेसातीत फार त्रास देत नाहीत असा अनुभव असला, तरी दुनियादारी मात्र शिकवतात. धंदे-उद्योग व नोकरीच्या संदर्भात कुंभेच्या व्यक्तींनी थोडी Provisional भूमिका घेऊन आगामी काळातील बदलांचा अभ्यास करून तशी मांडणी करायला हवी. प्लॅनिंग करायला हवं. व्यवहारातील किंवा रोजच्या बैठकीतील अनावश्यक व वेळेचा अपव्यय करणारी मंडळी/माणसं जरा कटाक्षाने लांब ठेवावीत. पैसे जपून वापरावेत/मौल्यवान वस्तू, रोख रक्कम, दागिने यांची हाताळणी/ने-आण आणि जपणूक अधिक सावधानतेने करावी. घरात चोरी/लूट होण्याची शक्यता साडेसातीत असते. कोणालाही आर्थिक मदत करताना ती प्रत्यक्ष करावी व नंतर विसरून जावे. ‘नेकी कर दरिया मे डाल’ ही भूमिका ठेवावी. साडेसातीच्या काळात कोणीही कायदेभंग/नियमभंग करू नये. त्याला हमखास दंड/शिक्षा होतेच होते. व्यसनाधीनतेकडे कल असल्यास संयम बाळगावा.

पुढे साडेसातीसाठी काही उपासना देत आहे. धनू/मकर/कुंभ/तूळ आणि मिथुनेच्या मंडळींनी या उपासनेपैकी जेवढ्या किंवा किमान दोन तरी शक्यतेनुसार कराव्यात ही नम्र विनंती; मात्र साडेसाती/अडीचकी काळात शनिवार सूर्योदय ते रविवार सूर्योदय या जवळपास २४ तासांच्या कालावधीत मद्यपान/मांसाहार/मांसखरेदी/जुगार/केस कापणे/तेलखरेदी(पेट्रोल/डिझेल/खाद्यतेल/ग्रीस/ऑइल)/चामडेखरेदी/धातूखरेदी (कोणताही धातू, यात सोनंही आलं) या गोष्टी करू नयेत. हे नियम वरील सर्व राशींनी कटाक्षाने पाळावेत. साडेसाती/अडीचकी असणाऱ्यांनी शनिवारी काळे वस्त्र धारण करू नये.

अन्य उपासना :

- शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर मारुती मंदिरात जाऊन मारुतीरायाच्या मस्तकावर अर्धी वाटी तिळाचे तेल, ११ काळे अख्खे उडीद, चिमूटभर मीठ एकत्र करून अर्पण करावे. साडेसातीचे नकारात्मक परिणाम कमी होऊन सुखशांतीसाठी प्रार्थना करावी. हा उपाय संध्याकाळी सूर्यास्तानंतरच करावा ही विनंती आहे. त्याच वेळी देवळात बसून हनुमान चालिसा/मारुती स्तोत्राचे वाचन करणेही श्रेयस्कर आहे. हाच उपाय शनिमंदीरातही जाऊन करू शकता; मात्र तसे केल्यास फक्त प्रार्थना करावी, स्तोत्रवाचन तिथे करू नये हे लक्षात ठेवावे. शनिमंदिरात फक्त शनिस्तोत्र चालते.

- ज्यांना शक्य आहे अशांनी शनिवारी सूर्योदयापासून रविवारी सूर्योदयापर्यंत एक वेळ उपवास करावा. आहार नियंत्रण ठेवावे. उपवासाचे कोरडे पदार्थ, फळे, चहा-कॉफी, फ्रूट ज्यूस व दुधाचे सेवन करावे.

- श्रीसमर्थ रामदासांनी लिहिलेले ‘भीमरूपी स्तोत्र’ (मारुती स्तोत्र) हे एक प्रभावी स्तोत्र आहे. हे स्तोत्र वाचनात ठेवले व रोज किमान तीन वेळा वाचन केले तरीही साडेसातीचे नकारात्मक परिणाम कमी व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे ‘हनुमान चलिसा’ स्तोत्रही तसेच प्रभावी आहे.

- साडेसातीत अन्नदानाला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे गोरगरीब, मुके प्राणी यांना शिजवलेले अन्न दान करावे. त्यात प्रामुख्याने आंबवलेले पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स, बिस्किटे, ब्रेड दान करावे. गोरगरिबांना/अपंगांना आणि वृद्धांना अन्नदान, औषधांच्या स्वरूपात केलेली मदत, वस्त्रदान या बाबी साडेसातीचे नकारात्मक परिणाम कमी करतात.

- श्रीरामचरितमानस या दिव्य ग्रंथातील ‘सुंदरकांड’ या दिव्य भागाचे वाचनही अनेक जण साडेसातीच्या काळात करतात. सुंदरकांडाचे वाचन हे शनिवारी संध्याकाळी मारुतीच्या फोटोसमोर तिळाच्या तेलाचा दिवा आणि चंदन अगरबत्ती लावून एकसलगपणे करावे. मध्येच उठणे, खाणाखुणा करणे व मोबाइलवर बोलणे कटाक्षाने टाळावे.

- साडेसातीसाठी एक पॉवरफुल उपाय म्हणजे शनिमालामंत्राचे वाचन हा होय. रोज संध्याकाळी न चुकता एकदा तरी शनिमालामंत्राचे वाचन करावे. हातपाय धुवून एका जागी स्थिरासनावर बसून शांतचित्ताने शनिमालामंत्र वाचन करावे. यामुळे साडेसातीचे निगेटिव्ह इफेक्ट किमान ५० टक्के तरी कमी होतात; पण या स्तोत्रवाचनाला मंगळवारी/शनिवारी आणि सोमवारी मांसाहार, मद्यपान न करण्याचे कडक बंधन आहे हे ध्यानात ठेवावे. (अंडं चालेल का? मद्यपानाऐवजी ताडी/माडी/बिअर चालेल का? असले फालतू प्रश्न विचारू नयेत.)

शनिमालामंत्र

अस्य श्रीशनैश्चरमालामन्त्रस्य काश्यप ऋषिः, अनुष्टुप् छन्दः,
शनैश्चरो देवता, शं बीजं, निं शक्तिः, मं कीलकं,
समस्तपीडा परिहारार्थे शनैश्चरप्रसादसिद्ध्यर्थे जपे विनियोगः ।
शनैश्चराय अङ्गुष्ठाभ्यां नमः, कृष्णवर्णाय तर्जनीभ्यां
नमः, सूर्यपुत्राय मध्यमाभ्यां नमः, मन्दगतये अनामिकाभ्यां
नमः, गृध्रवाहनाय कनिष्ठिकाभ्यां नमः, पङ्गुपादाय करतल-
करपृष्ठाभ्यां नमः, एवं हृदयादि न्यासः ॥

ध्यानम् ॥

दोर्भिर्धनुर्द्विशिखचर्मधरं त्रिशूलं
भास्वत्किरीटमुकुटोज्ज्वलितेन्द्रनीलम् ।
नीलातपत्रकुसुमादिसुगन्धभूषं देवं
भजे रविसुतं प्रणतोऽस्मि नित्यम् ॥

ॐ नमो भगवते शनैश्चराय मन्दगतये सूर्यपुत्राय महाकालाग्नि-
सदृशाय क्रूर (कृश) देहाय गृध्रासनाय नीलरूपाय चतुर्भुजाय
त्रिनेत्राय नीलाम्बरधराय नीलमालाविभूषिताय धनुराकारमण्डले
प्रतिष्ठिताय काश्यपगोत्रात्मजाय माणिक्यमुक्ताभरणाय छायापुत्राय
सकलमहारौद्राय सकलजगत्भयङ्कराय पङ्कुपादाय क्रूररूपाय
देवासुरभयङ्कराय सौरये कृष्णवर्णाय स्थूलरोमाय अधोमुखाय
नीलभद्रासनाय नीलवर्णरथारूडाय त्रिशूलधराय सर्वजनभयङ्कराय
मन्दाय दं, शं, नं, मं, हुं, रक्ष रक्ष, ममशत्रून्नाशय,
सर्वपीडा नाशय नाशय, विषमस्थशनैश्चरान् सुप्रीणय सुप्रीणय,
सर्वज्वरान् शमय शमय, समस्तव्याधीनामोचय मोचय विमोचय,
मां रक्ष रक्ष, समस्त दुष्टग्रहान् भक्षय भक्ष्य, भ्रामय भ्रामय,
त्रासय त्र्रासय, बन्धय बन्धय, उन्मादयोन्मादय, दीपय दीपय,
तापय तापय, सर्वविघ्नान् छिन्धि छिन्धि,
डाकिनीशाकिनीभूतवेतालयक्षरक्षोगन्धर्वग्रहान् ग्रासय ग्रासय,
भक्षय भक्षय, दह दह, पच पच, हन हन, विदारय विदारय,
शत्रून् नाशय नाशय, सर्वपीडा नाशय नाशय,
विषमस्थशनैश्चरान् सुप्रीईणय सुप्रीणय, सर्वज्वरान् शमय शमय,
समस्तव्याधीन् विमोचय विमोचय, ओं शं नं मं ह्रां फं हुं,
शनैश्चराय नीलाभ्रवर्णाय नीलमेखलय सौरये नमः ॥

....शनिमालामंत्र हा शनिपीडानाशक व संरक्षक मानला जातो. शनिपीडेपासून रक्षण होऊन आरोग्यप्राप्ती, सुयशप्राप्ती, गूढ बाधांपासून मुक्तता होते. ही उपासना पूर्ण झाल्यावर पुनश्च शनिस्मरण, प्रार्थना करावी. कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी, समाजासाठी अभिष्टचिंतन करावे. आणि उपासना समाप्त करावी...

(बाकी उर्वरित उपाय, उपासना पुढील लेखात... तो लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

- सचिन मधुकर परांजपे (पालघर)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZFZCH
Similar Posts
धनू, मकर, कुंभ राशीला साडेसाती; काही उपाय, उपासना (उत्तरार्ध) शुक्रवार, दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी सकाळी नऊ वाजून ५३ मिनिटांनी शनिमहाराज मकरेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे त्या वेळेपासून वृश्चिकेची साडेसाती संपून कुंभेची साडेसाती सुरू होते आहे. अशा रीतीने आता धनू, मकर आणि कुंभ या तीन राशींना साडेसाती सुरू असणार आहे. त्या निमित्ताने, पालघरचे ज्योतिष मार्गदर्शक सचिन
अडीचकी म्हणजे काय रे भाऊ? साडेसाती ही संकल्पना आता आपल्यापैकी अनेकांना परिचयाची आहेच; पण ‘अडीचकी’ म्हणजे एक्झॅक्टली काय, हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. शनिमहाराज प्रत्येक राशीत साधारणपणे त्यांच्या मंद गतीनुसार अडीच वर्षे भ्रमण करून मग पुढील राशीत प्रवेश करत असतात. त्यांचे हे राशीभ्रमण जेव्हा तुमच्या अगोदरच्या+तुमच्या+तुमच्या नंतरच्या अशा तीन राशीत मिळून (२
राशी आणि स्वभावांच्या गमतीजमती सिंह रास ही राजयोगी रास म्हणतात. सिंहेची मंडळी थोडी आक्रमक, हुकूमशाही वृत्तीची वगैरे खरं असलं, तरी त्यांचा मूळ स्वभाव हा अत्यंत शांतताप्रिय, सलोखा ठेवणारा आणि शिस्तप्रिय असतो. सिंह मंडळी कधीच भांडकुदळ आणि कुचाळक्या करणारी नसतात.
नऊ फेब्रुवारीच्या मकर षट्ग्रहीचा परिणाम सर्व राशींवर नऊ फेब्रुवारीच्या मकर षट्ग्रहीचा परिणाम साधारणपणे ३० मार्चपर्यंत असू शकतो. मकर राशीत रवी, शनी, गुरू, बुध, शुक्र आणि चंद्र एकत्र येत आहेत. मकर रास कालपुरुषाच्या कुंडलीत दशम (कर्म) स्थानी येते आहे. त्यामुळे एकंदरीत व्यवहारिक पातळीवर कोणत्याही कारणाने उद्योगधंदे, व्यापार यावर थोडा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language